Pundalik Samachar

अखेर रांझणी ग्रामस्थ, विद्यार्थ्याचे आमरण उपोषण मागे, पोलीस बंदोबस्तात रस्ता करून देण्याचे तहसीलदारांचे लेखी आश्‍वासन



पंढरपूर/ प्रतिनिधी

रांझणी (ता. पंढरपूर) येथील रस्ता अडविल्याने ग्रामस्थांसह गणवेशासह विद्यार्थ्यांनी सोमवार, दि. 21 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले होते. तिसर्‍या दिवशी तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी चार दिवसात पोलीस बंदोबस्तात रस्ता करून देण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यानंतर ग्रामस्थ अन् चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले.

रांझणी येथील शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी पंढरपूर येथील तहसील कार्यालयाच्या गेटसमोर गेल्या तीन दिवसांपासून रांझणी ते शिंदेवस्ती (तरटगाव) रस्त्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. शिंदेवस्ती ते रांझणी रस्त्याचे काम काही नागरिकांनी अडविले होते. त्यासंदर्भात तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जि.प. बांधकाम अधिकारी लटके, आटकळे यांनी रांझणी ते शिंदेवस्ती (तरटगाव) यांनी संपूर्ण रस्त्याची दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी प्रत्यक्ष पाहणी केली. यानंतर रस्त्याची अडवणूक करणार्‍या संबंधित शेतकरी, ग्रामस्थांना लेखी नोटीसा काढण्यात आल्या आहेत. येत्या चार दिवसात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस बंदोबस्तात रस्ता पूर्ण करण्याचे लेखी आश्‍वासन दिले.

यावेळी माजी जलसंधारण अधिकारी पंडित भोसले,  रयतक्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष    दीपक भोसले, कामगार नेते शिवाजी शिंदे, सुभाष मस्के यांनी आंदोलनकर्ते व तहसीलदार बेल्हेकर यांच्याशी चर्चा घडवून आणल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे आंदोलनकर्ते दादा घायाळ, हनुमंत शिंदे, नागेश जाधव, शंकर शिंदे, राजाराम शिंदे, नितीन शिंदे, तानाजी शिंदे, बाळासाहेब शिंदे, अक्षय शिंदे, भीमा राजगुरू यांच्यासह महिला, विद्यार्थ्यांनी हे आमरण उपोषण मागे घेतले.


आपल्या परिसरातील बातम्या व जाहीरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
मो.नो-; 8888388139/9004537171
Mail id-: vijaykumarkamble501@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post