डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार -: चेअरमन विश्वराज महाडिक
मोहोळ/प्रतिनिधी
भिमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ, जि. सोलापूर या कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व संचालक, शेतकरी सभासद यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी डिस्टिलरी इथेनॉल प्रकल्प लवकरच कारखान्यावर कार्यान्वित होईल अशी ग्वाही यावेळी सभासदांना दिली.
खासदार धनंजय महाडिक यांनी बोलताना एनसीडीसीकडून अर्थसहाय्य मिळवून दिल्याबद्दल केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानले. खासदार महाडिक यांनी सहकार मंत्रालयाद्वारे चालवल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देत शेतकऱ्यांना समृद्धीचा एक नवा मंत्र दिला. गावोगावी असणाऱ्या विकास सोसायट्यांच्या माध्यमातून २८ पेक्षा जास्त कृषी संलग्न प्रकल्प सुरु करता येतात यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच कोल्हापूर विमानतळ प्रमाणेच सोलापूर विमानतळ देखील विकसित करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
भीमा कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी विषय वाचन करताच 'मंजूर मंजूर' च्या घोषणा देत सभासदांनी सर्व विषयांना मंजूरी दिली. संस्थापक चेअरमन कै पैलवान भीमराव महाडिक यांच्या दूरदृष्टीतून कारखाना उभारला गेला. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांचे नाव देण्याची मागणी शेतकरी सभासदांकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. भीमा सहकारी साखर कारखान्याचे "कै. पैलवान भीमराव महाडिक सहकारी साखर कारखाना" असा नामांतराचा ठराव मांडताच सभासदांनी नामांतरास मंजुरी देत संस्थापकांना अभिवादन दिलं.
चेअरमन विश्वराज महाडिक यांनी आपली पहिलीच वार्षिक सभा अत्यंत अभ्यासपूर्ण व दूरदृष्टीने मांडणी करत सभासदांची मनं जिंकली. मोलॅसिस पासून नाही तर थेट उसाच्या रसापासूनच इथेनॉल निर्मिती करणार असल्याचे सांगत प्रचारादरम्यान तिसरी चिमणी उभारण्याचं दिलेलं आश्वासन लवकरच डिस्टिलरी-इथेनॉल प्रकल्प कार्यान्वित करून पूर्णत्वास नेऊ असा विश्वास दिला. खासदार महाडिक यांच्या अथक प्रयत्नांमुळे भीमा कारखान्याचा सुवर्णकाळ सुरु झाला आहे. भीमाच्या वजन काट्याबद्दल खात्री असल्याने शेतकरी सभासद ऊस घालण्यास उत्सुक आहेत. यापुढे ऊस बिल देयक देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी सभासद भीमा कारखान्यालाच ऊस घालतील असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. यावर्षी ऊस वाहतुकीसाठी तब्बल ५५० बैलगाड्या, ४५० ट्रॅक्टर गाडी, १८५ चार चाकी ट्रॅक्टर आणि ५ मशीन अशी तगडी तोडणी वाहतूक यंत्रणा भरत हंगामाचे योग्य नियोजन केल्याची माहिती त्यांनी दिली.
चौकट....
【 चेअरमन विश्वराज महाडिक यांनी अभ्यासू, आशयपूर्ण व प्रगल्भ भाषणाने जिंकली मनं...
आपल्या पहिल्याच वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वर्गीय भीमराव महाडिक हे विषय सोप्पा करून सांगण्यासाठी गोष्टी सांगत असतं तोच धागा पकडत चेअरमन विश्वराज यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. जंगलाला आग लागलेली असताना हार न मानता निडरपणे लढणाऱ्या चिमणीची गोष्ट सांगत त्यांनी भीमराव दादांच्या आठवणी जागवल्या. ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती, बायोडिझेल निर्मिती अशा विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. कारखान्याच्या माध्यमातून सर्वाधिक दर देण्यासाठी वाणिज्य शाखेतील शिक्षणाचा उपयोगच होईल याची खात्री बोलून दाखवली. उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मिती साठी सोलापूर विमानतळ महत्वपूर्ण ठरेल असे सांगत खासदार महाडिक यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रश्नांकडे देखील लक्ष द्यावे अशी विनंती करत आपला विकासाभिमुख दृष्टिकोनाची चुणूक दाखवली.
चौकट
【 खासदार महाडिक यांच्या सरकारकडे या मागण्या
ऊस पिकाचा पीक विम्यात समावेश करावा
हंगामी कर्ज परतफेडीस दोन वर्षांची मुदतवाढ व व्याज अनुदान मिळावे
इथेनॉल खरेदी दर ७० रुपये करावा
साखर निर्यात धोरण ठरवावे
साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३६०० रुपये करा.】
Post a Comment