पंढरपूर /प्रतिनिधी
“कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन तो विविध प्रकारची भांडी बनवतो तशाच प्रकारे शिक्षक हे विद्यार्थ्यामधील विशेष गुण लक्षात घेऊन त्यांना आकार देत असतात. ज्या वेळी कल चाचणी चा प्रकार अस्तित्वात नव्हता तेंव्हा शिक्षक विद्यार्थ्यामधील विशेष कला गुणांची पारख करून त्यांना जीवनातील योग्य रस्ता दाखवत असत. ग्रामीण भागातील शिक्षकाची नाळ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत असते. विद्यार्थ्यांच्या घरातील प्रत्येक समस्येची जाण शिक्षकांना असते. त्यावर मात देवून यश साध्य करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मदत करत असतात. त्यामुळेच शिक्षक हे विद्यार्थ्यांचे दुसरे आई वडील असतात. असे मानले जाते.” असे प्रतिपादन पंढरपूर येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सेवक कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘शिक्षक दिन’ समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, उपप्राचार्य प्रा. राजेश कवडे, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रांताधिकारी गजानन गुरव पुढे म्हणाले की, “माणूस कितीही मोठा झाला तरी त्याला आपल्या गुरूच्या उपकाराची परतफेड करता येत नाही. आई वडील आपणास केवळ जन्म देत असतात परंतु जीवनातील सर्व मार्ग दाखविण्याचे कार्य शिक्षकच करत असतात. ज्यांनी शिक्षकांचे ऐकून जीवन मार्गक्रमण केले. त्यांना जीवनात यश, कीर्ती, पैसा आणि प्रतिष्ठा मिळते. शिक्षकांच्या या उपकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम म्हणजेच शिक्षक दिन होय. समाज जीवनात शिक्षकांना योग्य तो मानसन्मान मिळाला पाहिजे.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या मुलामुलींना शिक्षक देण्याचे महत्कार्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ होते. हिंदू धर्मातील तत्त्वज्ञान जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे महान कार्य त्यांनी केले. जागतिक कीर्तीचे वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. ‘वेदातील नीतिशास्त्र’ या विषयावरील त्यांच्या अभ्यासाचा खुद्द महात्मा गांधी यांनी गौरव केलेला होता. शिक्षकांचा सन्मान व्हावा ही डॉ. सर्वपल्ली राधा कृष्णन यांची इच्छा होती म्हणून त्यांनी स्वत:चा जन्म दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा. ही अपेक्षा व्यक्त केली म्हणून पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवक कल्याण समितीचे चेअरमन डॉ. उमेश साळुंखे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी डॉ. दत्तात्रय चौधरी यांनी करून दिला. या कार्यक्रमात कु. सृष्टी पवार, कु. विद्या कांबळे व कु. अक्षदा घुले या विद्यार्थिनीनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर व व्यवसाय अभ्यासक्रम विभागातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचा गुलाबपुष्प व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रुती काशीद व नमृता पाटील यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार कु. प्रणाली बेदरे हिने मानले.
आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक
साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS NEWS चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com
Post a Comment