Pundalik Samachar

मंदिर समितीस मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या रक्षक सिक्युरीटी पुणे यांचा अखेर ठेका रद्द....

पंढरपूर /प्रतिनिधी

 श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूरला आवश्यकतेनुसार आऊटसोर्सिंग पध्दतीने कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा.लि., पुणे यांची ई निविदा मंजुर होऊन दि. 04 जुलै, 2024 रोजी करारनामा करण्यात आला होता. तथापि, त्यांचेकडून करारनाम्यातील अटी व शर्ती चे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

मनुष्यबळ / कर्मचारी पुरवठा कामामध्ये वारंवार नोटीस देऊनही त्या संदर्भात योग्य तो खुलासा व सुधारणा होत नसल्याचे दिसून आले होते. तसेच त्यांच्या कामाबाबत विविध प्रकारच्या लेखी तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मंदिर समितीच्या दि.10 डिसेंबर, 2024 रोजीच्या सभेत चर्चा होऊन, संबंधित पुरवठाधारकास अंतिम नोटीस देऊन, त्यांचेकडून लेखी खुलासा घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे ठरले होते. त्यानुसार संबंधित कंपनीला अंतिम नोटीस देण्यात आली होती. त्यावर त्यांनी सादर केलेला खुलासा वस्तुस्थितीला धरून व समाधानकारक नाही.

मंदिर समितीने माहे फेब्रुवारी, 2024 मंदिर समितीला कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचारी पुरवठा करणे कामी ई निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे 4 कोटी 50 लाख होती. या प्रक्रियेत 12 पुरवठाधारकाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये रक्षक कंपनीचा ठेका मंजूर झाला होता.

रक्षक कंपनीने नियुक्त केलेले कर्मचारी हे भाविक भक्तांना धक्काबुक्की करतात व त्यांना ढकलून देतात, भाविकांशी नम्रतेने न वागणे, कर्मचारी आयकार्ड व गणवेश परिधान करीत नाही, नेमूण दिलेली सेवा व्यवस्थितपणे पार न पाडणे, मंदिरात प्रवेश करणा-या गेटवर भाविकांची तपासणी न करता मोबाईलसह मंदिरात प्रवेश देऊन करारातील अटी-शर्तीचा भंग करणे, 25 पैकी फक्त 2 माजी सैनिक नियुक्त करून करारातील अटीचा भंग केला, कर्मचा-यांना पेमेंट स्लिप न देणे, कर्मचा-यांना चांगले प्रशिक्षण न देणे, सुरक्षा विभागाकडील कर्मचारी कंपनीचे बोधचिन्ह असलेले गणवेश वापरत नाहीत, सेवेच्या ठिकाणी मोबाईल वापरणे व इतर अनुषंगीक गैरवर्तन करीत असल्याच्या बाबी अनेकवेळा निदर्शनास आलेल्या आहेत. याबाबत अनेकवेळा लेखी व मौखिक सुचना करूनही सुधारणा झाली नाही. तसेच नियुक्त केलेल्या कर्मचा-यांचे वेतन वेळेत अदा न करणे, कर्मचा-यांना दोन नग गणवेश न देणे, पुरवठा आदेशापेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करून बिलाची मागणी करणे. याबाबत मंदिर समितीने संस्थे विरूध्द अनेकवेळा कारणे दाखवा नोटीस बजावून व समज देऊन ही सुधारणा होत नसल्याने तसेच वर नमूद अन्य कारणाने करारानुसार दंडात्मक कारवाई वेळोवेळी केली होती. 

तथापि, त्यासंदर्भात सुधारणा अथवा कोणतीच कारवाई झाली नाही. सेवा पुरवठा कालावधीच्या एक वर्षातील 6 महिने होऊन देखील सुधारणा नाही व यापूढे देखील सुधारणा होईल असे वरील कारणास्तव वाटत नाही. तसेच सदरचा करार यापूढे देखील सुरू ठेवल्यास, मंदिर समितीची प्रतिमा जनसामान्यात मलिन होईल. त्याचा भाविकांच्या सोई सुविधेवर परिणाम होऊन, त्याचा रोष मंदिर समितीवर येऊ शकतो. त्या संदर्भात थेट प्रसारमाध्यमांतून बातम्या प्रसिध्द होऊन मंदिर समितीची बदनामी झाली आहे, तसेच दि.04 जानेवारी रोजी भटक्या कुत्र्यांचा मंदिरात मुक्त वावर अशा विविध प्रसारमाध्यमांत बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत. यावरून त्यांचेकडील कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत नसल्याचे पून्हा एखदा दिसून आले आहे. त्यामुळे रक्षक सिक्युरीटी सर्व्हिसेस ॲड सिस्टम्स प्रा.लि., पुणे ही संस्था करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामकाज करू शकत नसल्याने आणि वारंवार नोटीस देऊनही त्या संदर्भात योग्य तो खुलासा व सुधारणा होत नसल्याने, त्यांच्याशी करण्यात आलेला करार रद्द करणे क्रमप्राप्त झाले होते असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

👉 आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क
विजयकुमार कांबळे
संपादक

साप्ताहिक पुंडलिक समाचार , वेब पोर्टल आणि PS न्युज चॅनेल
मोबाईल नंबर -; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail. com


Post a Comment

Previous Post Next Post