Pundalik Samachar

आईच्या अंत्यविधीनंतर अस्थी विसर्जन न करता केले पोलीस पुत्राने वृक्षारोपण

भंडीशेगांव ता.पंढरपूर येथील पोलीस कॉन्स्टेबल वामन येलमार यांच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार मृताच्या अस्थी व राख नदीपात्रात सोडण्याची परंपरा आहे, परंतु वामन येलमार व त्यांच्या कुटुंबातील सर्वच जणांनी सदर अस्थी आणि राख नदी पात्रात न सोडता नदीचे प्रदूषण टाळून घरासमोर खड्डे घेऊन त्यात राख टाकून त्यावरती वृक्षारोपण करून समाजात एक आदर्श घालून दिला.

मुंबई येथील उद्योजक व वृक्षमित्र अजित कंडरे यांनी भंडीशेगांव येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपणची चळवळ सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच वेगवेगळ्या विविध कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणनी करण्याचा गावात एक पायंडाच पडला आहे. यावेळी मात्र पोलीस कॉन्स्टेबल वामन येलमार यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अस्थी नदीपात्रात सोडण्याऐवजी त्या अस्थी व राख शेतात खड्डयात टाकून त्यांवर एक झाड लावून त्या झाडाचे निगा राखून आपल्या आईचे स्मरण राहावे व त्यांची आठवण राहावी अशी कल्पना बाबासाहेब येलमार गुरुजी यांनी व्यक्त केली.त्यानुसार सर्वांनी या निर्णयाला सहमती देऊन यापुढेही सर्वांनी असेच वृक्षारोपण करण्याचे मान्य केले.

वामन येलमार हे पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यरत असून स्वतः ते माळकरी विठ्ठल भक्त आहेत.अत्यंत धार्मिक असा त्यांचा स्वभाव आहे.पंढरपूर येथील प्रत्येक वारी मध्ये त्यांनी महाराष्ट्र मधून पंढरपूरला बंदोबस्त साठी आलेल्या हजारो पोलीस बांधवांची मोफत भोजन व्यवस्था केली होती.त्याचप्रमाणे त्यांनी सह्याद्री हॉस्पिटलचे लिव्हर प्रत्यारोपण तज्ञ डॉ.बिपीन विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त देखील वृक्षारोपण केले होते.

यावेळी बाबासाहेब येलमार,संतोष भोसले,भाजपा वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार,मारुती गिड्डे,महादेव येलमार,भैरवनाथ यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष संतोष येलमार,बलभीम तोडले,हनुमंत येलमार आदी उपस्थित होते.


आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क
संपादक
विजयकुमार कांबळे
पंढरपूर
मो.नो-; 8888388139/9004537171
Vijaykumarkamble501@gmail.com

Post a Comment

أحدث أقدم