उपमुख्यमंत्री अजित पवार व कामगारमंत्री सुरेश खाडे यांचेकडून मोठा दिलासा
पंढरपूर (प्रतिनिधी):- वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. पंढरपुरातील जातीवंत पारंपारिक वारसा-परंपरेने या तुळशी माळा बनवणारा काशीकापडी समाज वारकरी सांप्रदायाच्या उगमापासुन ते आजपर्यंत वारकर्यांची मनोभावे सेवा करत आहे. परंतु या समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याच प्रश्नांना सोडविण्यासाठी तुळशीमाळा कारागीर कामगार संघाचे शिष्टमंडळ थेट मुंबईत गेले आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कामगारमंत्री सुरेश खाडे यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समाजाच्या प्रमुख प्रश्न सोडविण्याबाबतचे निवेदन दिले. काशीकापडी समाजाचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी यावेळी दिलेय. यानिमित्ताने आजतागायत शासनाच्या विविध लाभांपासुन वंचित असणार्या काशीकापडी समाजाला शासन दरबारी न्याय मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
काशीकापडी समाजाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
तुळशीमाळा कामगारांची असंघटीत कामगार म्हणून कामगार महामंडळात नोंदणी करावी, तुळशीमाळा कामगारांना स्वत:चे घर बांधण्यासाठी घरकुल योजनेतून अनुदान मिळावे, सरकारी बँकेतुन तुळशीमाळा कामगारांना विनातारण कर्ज उपलब्ध करुन मिळावे, 50 वर्षांवरील तुळशीमाळा कामगारांना मासीक पेंशन 5 हजार रुपये सुरु करावी, तुळशीमाळा कामगारांना पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने समाजभवन बांधण्यासाठी जागा मिळावी, पंढरपूर नगरपरिषदेकडून तुळशीमाळा कामगारांना व्यवसाय करण्यासाठी पथविक्रेता परवाना मिळावा.
अशा आशयाच्या मागणीचे निवेदन यावेळी मंत्री महोदयांना देण्यात आले असुन लवकरात लवकर वरील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शासनाकडून देण्यात आले आहे.
यावेळी तुळशीमाळा कारागीर कामगार शिष्टमंडळातील माजी नगरसेवक रामभाऊ भिंगारे, पंढरपूर काशीकापडी समाज अध्यक्ष औदुंबर गंगेकर, तुळशीमाळा कामगार युवक प्रतिनिधी श्रीनिवास उपळकर, तुळशीमाळा कामगार प्रतिनिधी गणेश भिंगारे, तुळशीमाळा कामगार प्रतिनिधी पांडुरंग वाडेकर, तुळशीमाळा कामगार प्रतिनिधी दत्तात्रय वाडेकर आदी उपस्थित होते.
إرسال تعليق